BARAMATI : टिवल्या बावल्या : हल्ल्याचा बनाव की व्हीआयपी ताफ्याचा डाव?

बारामतीत काय चाललंय राव..! आधी हल्ल्याची बातमी आली, मग सुपारीची चर्चा रंगली, पोलिसांनी आरोपी पकडले अन् पुढं तपासात जे धागेदोरे समोर येऊ लागले, त्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सुरुवातीला वाटलं, अरे बापर, किती भयंकर प्रकार घडलाय..! पण आता प्रकरणाला मिळालेलं वळण पाहता, ही हल्ल्याची कहाणी होती की व्हीआयपी होण्याच्या हौसेचा नवा प्रयोग, असाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही!

गोजूबावी परिसरात राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी आली अन् सगळीकडं चर्चा सुरू झाली. पिस्तूल, धारदार शस्त्रं, हल्लेखोर, सुपारी.. प्रकरण एकदम फिल्मी.. पोलिसांनी तपास सुरू केला, आरोपींच्या मुसक्या आवळल्या अन् चौकशी जसजशी पुढं सरकू लागली, तसतशी कहाणीच वेगळं वळण घेऊ लागल्याचं दिसलं. आता तर, या सगळ्या प्रकारामागं व्हीआयपी संरक्षण मिळवण्याची इच्छा होती असंच बोललं जातंय.

आता याला काय म्हणायचं राव! सामान्य माणूस आपल्याला कुणापासून धोका आहे, हे सांगत पोलिसांकडं संरक्षण मागतो. इकडं कुणाला संरक्षण मिळवण्यासाठीच स्वतःवर संकट ओढवून घ्यावंसं वाटत असेल, तर अशा अक्कलहुशारीला काय म्हणावं? जीव वाचवण्यासाठी सुरक्षा हवी असते की लोकांनी आपल्याकडं बघून शिट्ट्या माराव्यात म्हणून सुरक्षा हवी असते? हा प्रश्नच डोकं खाजवायला लावणारा आहे.

काही लोकांना साध्या गाडीतून फिरण्यात कमीपणा वाटतो बहुतेक..! पुढं पोलिसांची गाडी, मागं पोलिसांची गाडी, मध्ये आपली गाडी अन् रस्त्यावर बाकीच्यांनी बाजूला व्हायचं.. गाडीच्या काचेतून बाहेर बघताना लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे, आपला रुबाब दिसला पाहिजे.. असा काहींचा हट्ट असतो. पण राव, रुबाब हा कर्तृत्वाचा असतो, पोलिसांच्या गाड्यांचा नाही. गाडीपुढं सायरन वाजला म्हणून माणसाची किंमत वाढत नाही; उलट सायरन कशासाठी वाजतोय, याचा हिशेब द्यायची वेळ आली तर भल्याभल्यांची हवा निघते..

आता या प्रकरणात व्हीआयपी ताफ्याची हौस हा मुद्दा चर्चेत येत असेल, तर एक विचारावंसं वाटतंय… एवढीच मोठं होण्याची हौस असेल, तर एखादं मोठं काम करून दाखवायचं ना राव..! चार लोकांच्या उपयोगी पडायचं, समाजासाठी काहीतरी करायचं, लोकांच्या अडचणी सोडवायच्या..!  लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळाच उद्योग केला, तर लगेच चर्चा होते, असं काहींना वाटत असेल तर त्याला काय करणार? फक्त लक्षात ठेवा, प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं; पण चुकीच्या कारणानं मिळालेली प्रसिद्धी आयुष्यभर पाठ सोडत नाही..!

आणि या सगळ्या प्रकारात जुन्या प्रकरणांचीही चर्चा होत असेल, तर त्याचीही नीट चौकशी व्हायला हवी. याआधी नेमकं काय घडलं, संरक्षणाची गरज का भासली, कुणाकडून धोका होता आणि आताच्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, हे स्पष्ट झालं पाहिजे. कारण एकदा अडचण आली तर समजू शकतं; पण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळंच नाट्य उभं राहत असेल, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच ना..! अर्थात, जुन्या प्रकरणांचा निकाल लागल्याशिवाय कुणाला दोषी ठरवता येणार नाही. पण तपास यंत्रणांनीही कुठलीच कडी न तपासता सोडू नये, एवढीच अपेक्षा!

आता दुसरा विषय म्हणजे नेत्यांच्या जवळिकीचा. काही मंडळींची तर वेगळीच शान असते. कुणी म्हणतं, अमुक साहेब आपले खास..! कुणी सांगतं, तमुक नेत्याला आपण थेट फोन करतो.. ! कुणी नेत्यासोबतचा फोटो दाखवतं, तर कुणी दोन मिनिटांच्या भेटीचं असं वर्णन करतं, जणू काही राज्याचा सगळा कारभार आपल्याच सल्ल्यानं चालतो..! अरे बाबा, नेत्यांसोबत फोटो काढला म्हणजे नेता तुमच्या खिशात गेला का? एखाद्या कार्यक्रमात शेजारी बसला म्हणजे सगळे निर्णय तुम्हालाच विचारून होतात का? नेत्यांसोबत फोटो काढणं वेगळं अन् नेत्यांच्या नावावर दुकान चालवणं वेगळं. पण काहींना या दोन्ही गोष्टींतला फरकच समजत नसावा. चार लोकांसमोर साहेबांचं नाव घ्यायचं, फोनवर मोठमोठ्यानं बोलायचं, कुणाला तरी आपण वरपर्यंत पोहोचू शकतो असं दाखवायचं अन् आपलं काम साधून घ्यायचं, अशा प्रकारांना राजकीय जवळीक म्हणायचं की नावाचा वापर करून स्वतःचं वजन वाढवण्याचा प्रयत्न?

खरं तर नेत्यांची जवळीक असणं हा काही गुन्हा नाही. पण त्या जवळिकीचा वापर करून कुणावर दबाव आणला जात असेल, सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल किंवा आपला रुबाब वाढवण्यासाठी नेत्यांची नावं पुढं केली जात असतील, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. आणि हो, एखाद्या नेत्याशी ओळख असणं म्हणजे त्या नेत्याच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी तुमच्यावर येते असं नाही. पण त्या नेत्याच्या नावाचा वापर करून स्वतःचे उद्योग चालवले जात असतील, तर मग त्या नावाची बदनामीही होते. नेत्यांनीही आपल्या नावाचा गैरवापर कोण करतंय, कोण आपल्याशी असलेल्या संबंधांचा बाजार मांडतंय, याकडं लक्ष द्यायला हवं.

राणा सूर्यवंशी प्रकरणात नेमकं सत्य काय आहे, हे पोलिस तपासातून स्पष्ट होईलच. आरोप सिद्ध होण्याआधी कुणालाही दोषी ठरवणं योग्य नाही. पण या प्रकरणानं एक गोष्ट पुन्हा समोर आणली आहे. समाजात मोठं दिसण्याची हौस काही लोकांना इतकी असते की, मोठं होण्यासाठी काय करावं यापेक्षा मोठं दिसण्यासाठी काय करता येईल, याचाच ते जास्त विचार करतात.. लोकांनी आपल्याला ओळखावं असं वाटत असेल, तर कामातून ओळख निर्माण करावी लागते. आणि व्हीआयपी व्हायचं असेल, तर आधी आपल्या वागण्यात आणि कर्तृत्वात काहीतरी व्हीआयपी असायला हवं..!

बाकी, पोलिसांचा ताफा गाडीच्या पुढं असला म्हणून माणूस मोठा होत नाही; पण कायद्याचा फास मागं लागला तर मोठमोठ्या रुबाबदार गाड्यांचीही हवा निघते..! शेवटी एवढंच.. राजकारण असो, समाजकारण असो किंवा नेत्यांच्या जवळिकीचा विषय असो, प्रत्येकाला आपापला रुबाब दाखवायचा आहे. पण रुबाब दाखवण्याच्या नादात कायद्यालाच वेठीस धरायचा प्रयत्न झाला असेल, तर तो प्रकार कुणीही खपवून घेता कामा नये.. कारण व्हीआयपी ताफा मिळवण्याची हौस असू शकते, नेत्यांच्या जवळ असल्याचा अभिमानही असू शकतो; पण कायद्यापेक्षा मोठं होण्याची हौस मात्र महागात पडू शकते..! बाकी, या सगळ्या प्रकरणात तपासातून आणखी काय बाहेर येतंय, कोणाच्या दाव्यांत किती दम आहे अन् कोणाचा रुबाब किती दिवस टिकतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तूर्तास इतकंच..! बाकी बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्यात.. तोवर आपलं लक्ष आहेच..!

तुमचाच : टिवल्या-बावल्या

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!