SOMESHWAR BREAKING : सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्षपदाची खुर्ची कुणाला मिळणार..? अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची धावाधाव; सुनेत्रावहिनींच्या निर्णयाकडे लक्ष..!

सोमेश्वरनगर । न्यूज कट्टा      

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने विरोधकांना धक्का दिला. त्यानंतर आता नव्याने निवडून आलेल्या संचालकांमध्ये अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रं कुणाच्या हाती जाणार, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि प्रमोद काकडे यांच्या नावांची आघाडीवर चर्चा असली, तरी इतर इच्छुकांनीही आशा सोडलेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवणार की नव्या नेतृत्वाला संधी देणार? या प्रश्नाभोवती सोमेश्वरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ऐनवेळी पुरुषोत्तम जगताप यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभा केला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार यांनीही स्वतंत्र पॅनल उभा केला. त्यामुळं या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एकतर्फी झाल्याचं पाहायला मिळालं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीतील या विजयाची सर्वत्र चर्चा झाली.

आता येत्या आठवड्याभरात कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी धावाधाव सुरू केली आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि सहकारी साखर उद्योगासमोरील आव्हाने लक्षात घेता कारखान्याचा कारभार उत्तमरित्या चालवण्यासाठी सक्षम असलेल्या अनुभवी चेहऱ्यालाच अध्यक्षपदाची संधी दिली जाईल अशी चर्चा होत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने त्या कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष म्हणून काम केलेले राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रमोद काकडे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. तर संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, विक्रम भोसले, सुनील भगत, ऋषी गायकवाड हेही संचालक अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. आता सुनेत्रा पवार या अनुभवी चेहऱ्याला पसंती देणार की नव्या नेतृत्वाला संधी देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या आठवडाभरात निवडी होण्याची शक्यता असून अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याचं उत्तर निवडीच्या दिवशीच मिळणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!