बारामती | न्यूज कट्टा
पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघांनी हल्ला केला होता. याप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक आहेत. या कंपनीची महाराष्ट्रासह गोव्यातही कार्यालयं आहेत. शेतजमीन पाहण्यासाठी ते बारामतीत आले होते. ते बारामतीत पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत सूर्यवंशी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली होती.
आधी फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली, नंतर पिस्तूल रोखलं!
राणा सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात आले असताना दुचाकीवरून दोघे जण त्यांच्याजवळ आले. आपण तुमचे चाहते आहोत, तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असं सांगत त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोटो काढण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या एका तरुणाने अचानक पिस्तूल काढून राणा यांच्यावर रोखलं. पण पिस्तूल जाम झाल्याने गोळी झाडता आली नाही. हा प्रकार लक्षात येताच राणा सूर्यवंशी यांनी हल्लेखोराच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे पिस्तूल खाली पडलं. त्यानंतर हल्लेखोराने धारदार शस्त्राने राणा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
अंगरक्षकाने पकडलं, पण आरोपी हाताला चावा घेऊन पळाला!
या घटनेवेळी राणा सूर्यवंशी यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून पोलीस कॉन्स्टेबलही उपस्थित होता. हल्ल्यानंतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अंगरक्षकाने एका आरोपीला पकडलंही; मात्र आरोपीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि तिथून पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो शेताच्या दिशेने पळून गेला, तर दुसरा आरोपी दुचाकीवरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. विविध पथकांच्या मदतीने तपासाची चक्रं वेगाने फिरवण्यात आली.
दोन लाख रुपये कुणी आणि कशासाठी दिले?
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. चौकशीदरम्यान ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे या दोघांना २० ऑक्टोबर रोजी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हल्ल्यामागचं कारण अजूनही गुलदस्त्यात!
राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला? दोन लाख रुपये देण्यामागे काय कारण होतं? या हल्ल्याचं नियोजन आणखी कुणी केलं होतं का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




