पुणे : न्यूज कट्टा
समाजात आपण मैत्रीचे अनेक किस्से ऐकत असतो. मैत्रीसाठी काहीही अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र पुण्यात मैत्रीच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार घडला आहे. एका तरुणीला तिच्या मैत्रिणीने घरी बोलावून तुला तिघांसोबत थांबावं लागेल, अन्यथा तुला मारून टाकू अशी धमकी देऊन तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
भरत रोहिदास गव्हाणे (वय २८), आणि सुनोमो भरत गव्हाणे ऊर्फ सुमोना नूर इस्लाम शेख (वय २४, दोघे रा. वडगाव, सिंहगड रोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 3 जानेवारी रोजी संबंधित पीडितेला तिच्या मैत्रीणीने आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी तुला इथेच या तिघांसमवेत थांबावं लागेल अन्यथा आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या तिघांनी या पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला.
हा सर्व प्रकार घडत असताना संबंधित पीडितेने विरोध केला. मात्र आरडाओरडा केलास तर तुझा जीव घेऊ अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर संबंधित पीडितेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी पीडिटेच्या मैत्रीणीसह दोघांना ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.





