बीड : न्यूज कट्टा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. अशातच बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातच एका पोलिस कर्मचाऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज पहाटे कर्तव्यावर असताना या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून या आत्महत्येमागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अनंत इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी आत्महत्येचा प्रकार समोर आला. इंगळे हे पोलिस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस होते. पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बीड पोलिसांनी या घटनेबद्दल इंगळे यांच्या नातेवाईकांना माहिती दिली असून घटनास्थळाचा पंचनामा केला करत सर्व सोपस्कार पार पाडले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे बीड पोलिस प्रशासनात चर्चेला उधाण आले आहे. बीड पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे.





