बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. ११ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारामती शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे विकासकामांची पाहणी करत अजितदादा आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. तर सकाळी ८ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
अजितदादांचा उद्या बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजितदादा नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणार आहेत.
दुपारी २ वाजता भिगवण रस्त्यावरील मुक्ताई इम्पेरियल बॅंक्वेटस् अँड लॉन्सचे उदघाटन होईल. त्यानंतर ३ वाजता इंदापूर रस्त्यावरील मोतीबाग येथे शांताई टेक्सटाईल या दुकानाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ४ वाजता पणदरे-ढाकाळे रस्त्यावरील बनकरवस्ती येथे नर्मदा किसन अॅग्रो कृषी सेवा केंद्राचे उदघाटन होईल. ५ वाजता अंजनगाव येथील महावितरणचे ३३/११ केव्ही उपकेंद्र आणि उमाजी नाईक सहागृहाचे उदघाटन होणार आहे.





