बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील होळ येथे अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून स्वत:च्या नऊ वर्षांच्या मुलाचा भिंतीवर डोके आपटत गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खून करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडील, आजी आणि चुलत चुलत्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे.
दि. १४ जानेवारी रोजी पीयूष हा आपल्या घरात असताना त्याचे वडील विजय भंडलकर याने त्याला अभ्यास न करण्यावरून जाब विचारला. तू सतत घराबाहेरच असतो, अभ्यास करत नाही. तुझ्या आईप्रमाणेच माझी इज्जत घालवत आहेस असं म्हणत विजय भंडलकर याने रागाच्या भरात त्याला भिंतीवर आपटलं. एवढ्यावरच न थांबता त्याने पीयूषचा गळा दाबला. त्यानंतर पीयूषची हालचाल बंद झाल्याने विजय भंडलकर याने संतोष भंडलकर याच्या मदतीने त्याला नीरा येथील खासगी दवाखान्यात नेले.
नीरा येथील डॉ. भट्टड यांनी तपासणी करून पियुषचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. तसेच त्याचा मृतदेह पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानं तसे न करता पियुषचा चक्कर आल्यामुळे मृत्यू झाल्याचे गावात आणि नातेवाईकांना कळवले. तसेच त्याच्या अंत्यविधीची तयारी केली होती.
या प्रकाराची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, नागनाथ परगे, निलेश जाधव यांनी तात्काळ होळ येथे धाव घेतली. त्या ठिकाणी पियुषच्या अंत्यविधीची तयारी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकांशी पियुषच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याबाबत चर्चा करत मृतदेह ताब्यात घेतला.
त्यानंतर बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी पियुषचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पियुषचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि अंत्यविधी पार पडू दिला. त्यानंतर या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल केली. त्यामध्ये पियूषचा गळा दाबून खून केल्याचे आणि गुन्हा लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम १०३(१), २३८,३(५) नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पियुषच्या वडील विजय गणेश भंडलकर, आजी शालन गणेश भंडलकर आणि चुलत चुलता संतोष भंडलकर (सर्व रा. होळ ता. बारामती) या तिघांना अटक केली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार अनिल खेडकर, सागर देशमाने, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाऊसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, तौफीक मणेरी, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, भानुदास सरक, विकास येटाळे, निलेश जाधव, महीला पोलीस अंमलदार प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे, प्रियंका झणझणे यांनी ही कामगिरी केली.





