पुणे : न्यूज कट्टा
विवाहविषयक संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं भासवत एका डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले. नंतर आपण विवाहित असून पत्नी गरोदर असल्याचं सांगत लग्नाला टाळाटाळ केल्यामुळं पुण्यात एका डॉक्टर तरुणीनं स्वत:च्या दवाखान्यातच विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असं आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव आहे. तर तिची फसवणूक केल्याप्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. शंकर कॉलनी, सांगली) याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पल्लवी फडतरे या डॉक्टर तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर लग्नासाठी नोंदणी केलेली होती. याच संकेतस्थळावर विवाहित असलेल्या कुलदीप सावंत यानं अविवाहित म्हणून नोंदणी केली होती.
पल्लवी आणि कुलदीपची याच संकेतस्थळावर ओळख झाली. त्यानंतर कुलदीप सावंत यानं पल्लवीला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच तिच्याकडून तब्बल १० लाख रुपयेही उकळले. सुरुवातीला आपण लवकरच लग्न करू असं आश्वासन देणाऱ्या कुलदीपने एक दिवस आपण विवाहित असून आपली पत्नी गरोदर असल्याचं पल्लवीला सांगितलं. याच गोष्टीचा पल्लवीला जबर मानसिक धक्का बसला. त्यातूनच तिनं स्वत:च्या दवाखान्यात विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात कुलदीप सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी कुलदीप सावंत हा फरार झाला असून बिबवेवाडी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून विवाह जमवणाऱ्या संकेतस्थळांवर नोंदणीबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.





