CRIME NEWS : पिंपरी चिंचवडमध्ये युवतीचा धारदार शस्त्रानं वार करत खून; आर्थिक वादातून शेजाऱ्यानेच भाच्याच्या मदतीने काढला काटा

पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा  

पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत एका १८ वर्षीय युवतीची हत्या झाली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली असून आर्थिक व्यवहार आणि संबंधातून या युवतीची शेजारी राहणाऱ्याने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामा-भाच्याला अटक केली आहे.

कोमल भरत जाधव (वय १८) असं खून झालेल्या युवतीचं नाव आहे. या प्रकरणी उदयभान यादव (वय ४५) आणि त्याच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून तो कामानिमित्त वाल्हेकरवाडीत वास्तव्यास होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या वाल्हेकरवाडीत आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचं घर असून उदयभान यादव हा तिच्या शेजारीच राहत होता.

कोमल आणि उदयभान यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. त्यामुळं उदयभान यानं कोमलचा काटा काढण्याचा कट रचला होता. त्यानुसार त्यानं आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री हेल्मेट घालून दुचाकीवरून येत कोमलला घराबाहेर बोलावून घेतले. ती खाली येताच त्यानं थेट तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये कोमलचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिस तपासात कोमल आणि उदयभान यांच्यात संबंध होते. तसेच त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते. त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन आरोपीने भाच्याच्या मदतीने कोमलचा खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!