BARAMATI BREAKING : अनेकांना गंडा घालणारा बारामतीचा लखोबा लोखंडे अखेर गजाआड; दीड कोटींची फसवणूक आणि मारहाणीच्या प्रकरणात झाली अटक

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा 

एका नेत्याची जवळीक सांगून अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. बारामतीत दाखल झालेल्या गुन्ह्यात आनंद लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लखोबाच्या उद्योगांबाबत अनेक ठिकाणी गुन्ह्यांसह तक्रारी दाखल असल्याने आता लखोबाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

बारामतीजवळच्या एका नेत्याची जवळीक सांगत आनंद सतीश लोखंडे (रा. जळोची, बारामती) याने अनेकांना विविध आमिषं दाखवत गंडा घातला आहे. त्याच्या उद्योगांचा सर्वप्रथम ‘न्यूज कट्टा लाईव्ह’ने पर्दाफाश केला. त्याने अनेकांना गुंतवणुकीतून परताव्याचे आमिष दाखवले होते. तसेच बारामतीसह परिसरातील नामांकित कंपन्यांशी आपला करार असल्याचं सांगून दूग्धजन्य पदार्थ खरेदी करून उद्योजकांची फसवणूक केली होती. याबाबत बारामतीसह मुंबई, रायपूर, बीड, पुणे अशा विविध ठिकाणी तक्रारी दाखल आहेत.

बारामतीत दीड कोटींचा गंडा

दरम्यान, आनंद लोखंडे याच्यावर नुकताच आकाश उर्फ सुयोग कुंडलीक भिसे (रा. काटेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग भिसे आणि त्यांचे मित्र अजय शिवाजी ओमासे या दोघांना आनंद उर्फ लखोबाने त्याच्या विद्यानंद अॅग्रो फिड्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला २० टक्के इन्सेन्टीव्ह देईन असं आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितलं.

त्यावर आकाश भिसे यांनी २ लाख आणि अजय ओमासे यांनी १ कोटी ४८ लाख असे दीड कोटी रुपये ऑनलाईन देण्याची तयारी दर्शवली. मात्र ऑनलाईन व्यवहारात जीएसटी द्यावा लागेल असं सांगत लखोबाने रोख स्वरूपातच ही रक्कम द्या असा आग्रह केला. त्यामुळे या दोघांनी जुलै २०२४ मध्ये दीड कोटी रुपये रोख लखोबाकडे दिले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात इन्सेन्टीव्ह जमा होईल या अपेक्षेने बँकेत चौकशी केल्यानंतर कोणतीही रक्कम जमा झालेली नसल्याचं या दोघांच्या लक्षात आलं. त्यानंतर पाठपुरावा करूनही पैसे येत नसल्यामुळे या दोघांनी आपली रक्कम परत मागितली. त्यावर लखोबाने बारामती एमआयडिसीत असलेले दोन फ्लॅट नावावर करून देण्याच्या अटीवर १० दिवसांत पैसे देण्याचं मान्य केलं. मात्र त्यानंतरही त्यानं ही रक्कम परत केलीच नाही.

मी ५०० कोटींना चुना लावलाय..!

दरम्यानच्या काळात १४ मे रोजी आनंद लोखंडे याने आकाश भिसे आणि अजय ओमासे या दोघांना पैसे द्यायचे असल्याचं सांगून त्याच्या राहत्या घराजवळ बोलावलं. त्यांनंतर जातीवाचक शिवीगाळ करत तो थेट या दोघांच्या अंगावर धावून गेला. मी आतापर्यंत ५०० कोटींना चुना लावलाय, तुझं काय घेऊन बसलाय. माझे वरपर्यंत संबंध आहेत असं म्हणत त्यानं या दोघांना मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

आकाश भिसे याच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११९ (१), ३१६ (२), ३१८ (४), ३२४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लखोबा अर्थात आनंद सतीश लोखंडे याला अटक केली आहे. त्यामुळे आता लखोबाच्या अनेक उद्योगांचा पर्दाफाश होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!