SHOCKING : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वास्तव्य, तिनं लग्नाला नकार दिला अन त्यानं चाकूनं भोसकून तिचा खूनच केला..!

कोल्हापूर : न्यूज कट्टा

कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथे एका तरुणीचा तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार महिन्यांपासून ते एकत्र राहत होते. मृत तरुणीने लग्नाला नकार दिल्यानं चाकूने भोसकून तिचा खून करुन आरोपी फरार झाला आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३, रा. कसबा बावडा) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सतीश यादव (रा.उंड्री, ता. पन्हाळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, समीक्षा उर्फ सानिकाचं २०१९ मध्ये लग्न झालेलं होतं. मात्र पतीशी जमत नसल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच ती विभक्त झाली होती.

दरम्यानच्या काळात सानिकाने आपली मैत्रिण आयुषी आंपले (रा. तेलंगणा) हिच्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम सुरु केलं. या कामाच्या निमित्तानं तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. हे तिघेही सरनोबतवाडी येथील एका फ्लॅटवर गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत होते. इव्हेंट मॅनेजमेंटचे काम ते एकत्रच करत होते. सतीश यादवने तिला लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र सानिकाला त्याच्याशी लग्न करायचं नसल्यानं दोघांमध्ये वादही झाला होता.

नंतरच्या काळात लग्नाचा सिझन संपल्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम थंडावले होते. त्यामुळं फ्लॅटचं भाडं देणं परवडणार नसल्यानं त्यांनी हा फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चार दिवसांपूर्वी त्यांनी फ्लॅट सोडला. मात्र त्यांचे राहिलेले साहित्य नेण्यासाठी काल घरमालकाने फोन केल्यानंतर सानिका आणि आयुषी या दोघेही तिथे गेल्या. साहित्याची आवराआवर करत असताना सतीश यादव हाही तिथे पोहोचला.

सतीश आणि सानिकामध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्यानं आपल्याकडील चाकू तिच्या छातीत भोकसला. तो चाकू अक्षरश: सानिकाच्या छातीत अडकून राहीला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारीच खोलीत साहित्य भरत असलेली आयुषी तिथे आली. मात्र तोपर्यंत सतीशने फ्लॅटचा दरवाजा बाहेरुन लावून त्या ठिकाणाहून पळ काढला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे सानिका जागेवरच कोसळली.

आयुषीने आरडाओरड करत आपल्या एका मित्राला फोन केला. त्यानं फ्लॅटची कडी उघडल्यानंतर सानिकाला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून तिला सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी सतीश यादव हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहे. वडिलांचं निधन झाल्यामुळे सानिकावरच कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळं ती आपल्या कुटुंबीयांना सातत्याने आधार देत तुम्ही काळजी करू नका असं सांगायची. असं असताना तिचा खून झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!