बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या उद्या गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. त्यानंतरच नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून अनेकांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, पहिल्या सत्रातील मुलाखती झाल्यानंतर राष्ट्रवादी भवनातच मेळावा होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात अजितदादा काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत मुलाखती घेतल्यानंतर उमेदवार निश्चित करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार उद्या सकाळी ७ ते ८ या वेळेत बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर नगरसेवकपदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी भवनातच होणाऱ्या मेळाव्यात नगरपरिषद निवडणुकीबाबत अजितदादा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
या मेळाव्यानंतर माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी मुलाखती होणार आहेत. स्वत: अजितदादा इच्छुकांची संवाद साधत त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी मुलाखतीत आपणच कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाचा उमेदवार निवडताना संबंधितांचा जनसंपर्क, जनतेच्या कामांप्रतीची आत्मीयता, संबंधित पदावर काम करण्याची क्षमता, जनमानसात असलेली प्रतिमा अशा अनेक बाबींचा विचार केला जाणार आहे. तसेच प्रशासकीय कामातील अनुभवही लक्षात घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या मुलाखतींमध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.





