POLICE CONSTABLE MISSING : मला माझा पती आणून द्या, बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच फोडला टाहो..!

यवत : न्यूज कट्टा 

वरिष्ठांकडून होणारा जाच, कुटुंबाकडे होणारं दुर्लक्ष आणि मुलीचा वाढदिवस साजरा न करता आल्याचं स्टेटस टाकत यवत पोलिस ठाण्यातील निखिल रणदिवे हा पोलिस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, यवत पोलिसांची चार पथके या कर्मचाऱ्याच्या शोधात पाठवण्यात आली आहेत. दुसरीकडे आज रणदिवे यांच्या पत्नी व कुटुंबीयांनी यवतमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांची भेट घेत आपल्याला पतीला शोधण्याची आग्रही मागणी केली.

यवत पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केडगाव पोलिस चौकीत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी निखिल रणदिवे हे कालपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी आपल्याला पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचं स्टेटस टाकलं होतं. आपण आपल्या जीवाचं बरंवाईट करून घेत असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता रणदिवे यांचा कुटुंबीयांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आज रणदिवे यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांची भेट घेत मला माझा पती आणून द्या अशी आग्रही मागणी केली. गेले काही दिवस निखिल रणदिवे हे तणावात होते. घरात फारसं काही सांगत नसले तरी काल आपण फार तणावात असून बाहेरगावी जात असल्याचं सांगून ते निघून गेल्याचं त्यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता, त्यामुळं संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पतीचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

निखिल रणदिवे यांनी स्टेटस टाकल्यानंतर लागलीच यवत पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली. संबंधित कर्मचाऱ्याचा शोध घेणं ही पोलिसांची प्राथमिकता असून तो सापडल्यानंतर त्याने केलेल्या आरोपांबाबत चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!