भिगवण : न्यूज कट्टा
बारामती-भिगवण रस्त्यावरील पिंपळे गावच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि ऊस खाली करून माघारी चाललेल्या ट्रॅक्टरमध्ये धडक होऊन दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेत ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते ता. माळशिरस जि.सोलापूर) असं या घटनेत मृत पावलेल्या ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती-भिगवण रस्त्यावरील पिंपळे पाटी येथे उसाचा रिकामा ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की त्यामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला.
या दुर्घटनेत अमोल कुराडे या ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे ट्रॅक्टरचालकाला बाहेर पडता आलं नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिगवण पोलिस, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन अग्निशमन दलांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. याबाबत तपास करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.





