बारामती : न्यूज कट्टा
दारुची पार्टी करणाऱ्या तिघा मित्रांमध्ये वादावादी होवून दोघांनी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बारामती शहरात घडली आहे. आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात जाऊन केलेल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.
अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०, रा. बारामती) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे इस्टेट. बारामती) व प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगतापमळा, बारामती) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश लोंढे आणि दोघे आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. काल रात्री ते शहरातील जुन्या मोरगाव रस्त्यावरील वेताळबाबा मैदानात दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यांचा वाद इतका टोकापर्यंत गेला की समीर आणि प्रथमेश या दोघांनी अविनाशच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर दोघांनीही त्याला दगडाने ठेचले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आपण आपल्या मित्राचा खून केल्याचं लक्षात आल्यानंतर समीर आणि प्रथमेशने बारामती शहर पोलिसांना या घटनेची माहिती देत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे.





