CRIME NEWS : वृद्धाला कारमध्ये बसवलं, पुढे जाऊन कार जाळली; एक कोटींच्या विम्यासाठी बनाव रचणारा पोलिसांच्या जाळ्यात

लातूर : न्यूज कट्टा  

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कार जळीत प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एकानं एक कोटींच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत मृत पावलेल्या वृद्धाची ओळख पटली असून लिफ्ट मागणं या वृद्धाच्या जीवावर बेतलं आहे.

याबाबत माहिती अशी की, औसा तालुक्यातील वानवडा परिसरात शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी स्कॉडा कारला आग लागळ्याचं पाहिलं. त्यांनी तात्काळ आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर  पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात, ही कार संपूर्णपणे जळून खाक झाली होती. या कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असावा असा अंदाज लावला जात होता.

पोलिसांनी गणेश चव्हाण याची माहिती मिळवताना त्याच्या कॉल डिटेलही मिळवल्या. त्यामध्ये शंका आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करत गणेश चव्हाण हा जीवंत असल्याचं निष्पन्न केलं. गणेश चव्हाण हा एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत असल्याचं तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे, त्यानं स्वत:च्या नावानं एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढल्याचं आणि त्याचे पैसे मिळवण्यासाठी हा कांड रचल्याचं पोलिस तपासात कबूल केलं आहे.

गणेश चव्हाण हा लातूरकडून कारने येत असताना त्याला गोविंद किसन यादव या ५० वर्षीय व्यक्तीने लिफ्ट मागितली होती. या संधीचा फायदा घेत त्याने गोविंद यादव यांना कारमध्येच बांधून ठेवत कार पेटवून दिली. तब्बल चार तास जळत असलेल्या कारमध्ये गोविंद यादव यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. त्यांची ओळख पटवणेही अवघड झाले होते. मात्र पोलिसांना शंका आल्यानं त्यांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर या घटनेतील सत्य समोर आलं आहे.

दरम्यान, लातूर पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश चव्हाण याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथून अटक केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या गणेशला पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने या कटाची कबुली देत झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, गणेशच्या एक कोटींच्या हव्यासापायी एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!