बारामती : न्यूज कट्टा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत मेळावा घेत निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार दि. १७ जानेवारी रोजी घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
बारामती तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजितदादांनी मुलाखतींची तारीख जाहीर करत लवकरच उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी कृषिक प्रदर्शनाच्या उदघाटन होणार असून त्या कार्यक्रमानंतर अजितदादा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील.
बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये या मुलाखती पार पडणार आहेत. बारामतीकर म्हणून मी सर्वांनाच ओळखतो. त्यामुळं मुलाखतीदिवशी गर्दी न करता केवळ उमेदवारांनी उपस्थित राहावं अशा सूचनाही अजितदादांनी दिल्या आहेत. दि. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळं शनिवारी मुलाखती झाल्यानंतर उमेदवार यादीही तात्काळ जाहीर केली जाईल असे संकेत अजितदादांनी दिले आहेत.
दरम्यान, बारामतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. अनेकांनी पक्षाकडे मागणीही केली आहे. त्यानुसार शनिवारी या मुलाखती पार पडणार आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाकडून सर्वे केला जात असून त्यानुसार उमेदवार निश्चित केले जातील असेही संकेत अजितदादांनी दिले आहेत. त्यामुळं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुणाची लॉटरी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.





