BARAMATI POLITICS : जिल्हा परिषद, पंचायत समितीत बहुजन समाज पक्षही नशीब आजमावणार; बारामती तालुक्यात नऊ उमेदवार

बारामती : न्यूज कट्टा   

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून बारामती तालुक्यातील नऊ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेसाठी पाच आणि पंचायत समितीसाठी चार उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी दिली.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत काळूराम चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी लढत दिली होती. त्यामध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर त्यांची मुलगी संघमित्रा चौधरी ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत निवडून आली. त्यानंतर आता बहुजन समाज पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी निंबुत गटातून संतोष कांबळे, वडगाव निंबाळकर गटातून अश्विनी खोमणे, पणदरे गटातून विशाल घोरपडे, गुणवडी गटातून उर्मिला प्रवीण शिंदे आणि निरावागज गटातून संजय प्रल्हाद कांबळे यांचे अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी वडगाव गणातून दयानंद पिसाळ, पणदरे गणातून विशाल घोरपडे, मुढाळे गणातून ऋतुजा कोकरे आणि गुणवडी गणातून दिव्या कांबळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहर आणि तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असणारी मनमानी थांबवण्यासाठी बहुजन समाज पक्ष या निवडणुकीत उतरला आहे. जनतेच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य न देता केवळ दर्शनी भागांची रंगरंगोटी करून विकासाचा पोकळ दावा करण्याचं काम येथील राज्यकर्ते करतात. त्यामुळंच आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचं काळूराम चौधरी यांनी सांगितलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!