BARAMATI BREAKING : अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच कॅबिनेट; बारामतीच्या कटफळ येथील क्रीडा संकुलासाठी ७५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता

बारामती : न्यूज कट्टा    

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पहिलीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यामध्ये अजितदादांनी सुचवलेल्या विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामध्ये अजितदादांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील क्रीडा संकुलाच्या ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून विकासाचा ओघ कायम राहील यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

बारामती एमआयडीसीनजीक कटफळ रेल्वे स्थानकाजवळ २५ एकर क्षेत्रात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं. त्या अनुषंगाने अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा करत या प्रस्तावाला मंजूरी मिळवून दिलेली होती. क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित असलेले क्रीडा संकुल आता पूर्णत्वास येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या क्रीडा संकुलाच्या ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे.

आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. त्यामध्ये अजितदादांनी घेतलेल्या विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यातच बारामतीच्या या क्रीडा संकुलाच्या अंदाजपत्रकाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे या क्रीडा संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या क्रीडा संकुलात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोईसुविधा असणार असून त्यातून बारामतीच्या उदयोन्मुख खेळाडूंना फायदा होणार आहे.

अजितदादांचं दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर बारामतीतील प्रस्तावित कामांचं आणि विकासाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये उपस्थिती लावताच अजितदादांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळातही बारामतीच्या विकासाची गती कायम राहणार असल्यानं बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!