BARAMATI POLITICS : बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदाची उद्या होणार निवड; सुनेत्रा पवार यांच्याकडून कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब…?

बारामती : न्यूज कट्टा 

बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदाची उद्या सोमवार दि. ९ मार्च रोजी निवड केली जाणार आहे. बारामती तालुक्यात खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या किरण तावरे, दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार या तिघांच्या नावाची सभापतीपदासाठी चर्चा आहे. परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होते हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

बारामती पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार मागील आठवड्यात गटनेते आणि उपगटनेतेपदाची निवड करण्यात आली. गटनेते म्हणून बाबा चोरमले यांना, तर उपगटनेतेपदी नितीन काकडे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर उद्या सोमवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड केली जाणार आहे. सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे किरण तावरे, दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार या तिघांपैकी एकाला संधी मिळेल.

बारामती तालुक्याचा विचार करता इथल्या राजकीय परिस्थितीसह भौगोलिक आणि अन्य बाबींचे सखोल ज्ञान व राजकीय अनुभव असलेल्या व्यक्तीलाच पंचायत समितीचे सभापती पद दिले जाईल अशी शक्यता आहे. बारामती तालुक्यातील प्रश्नांची जाण आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास असलेल्या व्यक्तीकडे सभापतीपदाची जबाबदारी देणं सुनेत्रा पवार यांच्यासाठी सोईस्कर ठरणार आहे. त्यामुळं उद्याच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष वेधले असून सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे उद्या स्पष्ट होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. त्यांनीही अजितदादांच्या कार्यात खंड पडू नये यासाठी स्वत:चं दु:ख बाजूला सारत उपमुख्यमंत्रीपदासह पक्ष संघटनेची जबाबदारी घेत कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारी पदाची निवडही सुनेत्रा पवार यांच्याकडून केली जाणार आहे. बारामतीसह जिल्ह्यातील राजकारणात सुनेत्रा पवार यांचा अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांच्या निवडीत त्यांचं विशेष लक्ष असणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!