बारामती : न्यूज कट्टा
बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची निवड करण्यात आली. बारामती पंचायत समितीत आज पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या. दरम्यान, किरण तावरे यांच्या रूपाने बारामती तालुक्याला अनुभवी सभापती मिळाला असून त्याचा पुढील काळात पक्षाला फायदा होणार आहे.
बारामती पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची आज निवड करण्यात आली. त्यामध्ये सभापतीपदासाठी किरण तावरे आणि उपसभापतीपदासाठी शुभांगी आगवणे या दोघांचेच अर्ज दाखल करण्यात आले. त्यानुसार या दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल हेही उपस्थित होते.
बारामतीच्या सभापतीपदासाठी किरण तावरे यांच्यासह दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटना, प्रशासकीय अनुभव, तालुक्याबद्दल असलेलं ज्ञान लक्षात घेत किरण तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर उपसभापतीपदी नव्यानेच पंचायत समितीत निवडून आलेल्या शुभांगी आगवणे यांना संधी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनी दिलेल्या संधीचे आपण निश्चितच सोने करून दाखवू अशी ग्वाही किरण तावरे यांनी निवडीनंतर दिली. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज सभापती म्हणून निवड होत असताना अजितदादांची उणीव जाणवत असली तरी त्यांना अभिप्रेत काम करून दाखवू असेही त्यांनी नमूद केले.




