AJITDADA MEMORIES : अजितदादांच्या स्मृतींना मिळणार उजाळा; बारामतीत उद्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा..!

बारामती । न्यूज कट्टा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांचा ‘कृतज्ञता स्नेहमेळावा’ सोमवार, दि. २९ जून रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. युवा नेते जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा मेळावा अजितदादांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि त्यांच्या सहवासातील असंख्य आठवणींना उजाळा देणारा ठरणार असल्याची माहिती बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारामती पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी दि. २९ जून रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, विविध स्तरांवरील पदाधिकारी तसेच अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक दशकांत योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तावरे यांनी सांगितले.

या स्नेहमेळाव्यात अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी, निर्णयक्षम नेतृत्वाविषयी तसेच त्यांच्या सहवासात काम करताना आलेले विविध अनुभव उपस्थित सदस्यांकडून मांडले जाणार आहेत. विकासकामांबाबतची त्यांची दूरदृष्टी, प्रशासनावर असलेली पकड, लोकप्रतिनिधींशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि बारामतीच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले योगदान यावरही यावेळी आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

याशिवाय, अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ सदस्यांचे अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे जावा आणि नव्या-जुन्या पिढीतील संवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे किरण तावरे यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील अनुभवी सदस्य मार्गदर्शन करणार असून भविष्यातील विकासाच्या दिशेनेही सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

हा कार्यक्रम केवळ स्नेहसंमेलन न राहता बारामतीच्या विकास प्रवासात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करणारा आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व आजी-माजी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही किरण तावरे यांनी केले आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!