बारामती । न्यूज कट्टा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यावर्षी गणेशोत्सव काळात होणारा बारामती गणेश फेस्टिव्हल रद्द करण्यात आला असल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांनी दिली. केवळ गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
अजितदादांच्या पुढाकारातून बारामती गणेश फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली होती. त्यामध्ये बारामतीकरांना विविध मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येत असे. मात्र अजितदादांच्या अकाली निधनामुळे यावर्षीचा गणेश फेस्टिव्हल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. यावर्षी नटराज नाट्य कला मंडळात साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.
बारामतीकरांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन अजितदादांनी नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त ‘बारामती गणेश फेस्टिव्हल’ हा उपक्रम सुरू केला होता. त्यामध्ये कीर्तन, नाटक, मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र अजितदादांच्या निधनामुळे सर्वच बारामतीकर दु:खात आहेत. त्यामुळे यावर्षी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





