बारामती | न्यूज कट्टा
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आज (दि. ०४) पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारल्याची दुर्घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
सदर विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्समध्ये शिकत होती आणि सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेचा ताण घेत होती आणि टेन्शन येत असल्याचे आई-वडिलांकडे बोलत होती.
आज पहाटे १२:३० वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर ती टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून गच्चीवर गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने वडील तिला पाहण्यासाठी वर गेले असता, ती टेरेसच्या कड्यावर पाय सोडून बसलेली दिसली. वडिलांनी विचारणा केली असता तिने त्यांच्याकडे पाहून अचानक खाली उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीने उपचारादरम्यान काही काळ शुद्धीत असताना आईकडे पाणी मागितल्याचे पालकांनी सांगितले.
सध्या पालकांनी कोणाहीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. यापूर्वी ती घरातून निघून गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात होती, त्या प्रकरणाचीही कागदपत्रे तपासली जात आहेत. तिच्याकडे स्वतःचा मोबाईल नव्हता, ती पालकांच्या मोबाईलचा वापर करत होती. त्या अनुषंगाने डिजिटल माहिती पडताळणीची तजवीज ठेवली आहे.
घटनास्थळ पाहणी, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी व शिक्षकांचे जबाब नोंदवून बारामती शहर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





