BARAMATI BREAKING : झुंबा क्लासवर कारवाई टाळण्यासाठी ७ लाखांची लाच; ५ लाख घेताना पोलिस हवालदाराला अटक, बारामतीत खळबळ

BARAMATI BREAKING : झुंबा क्लासवर कारवाई टाळण्यासाठी ७ लाखांची लाच; ५ लाख घेताना पोलिस हवालदाराला अटक, बारामतीत खळबळ
बारामती | न्यूज कट्टा

झुंबा डान्स क्लास आणि जिमसंदर्भात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहाथ पकडले. यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित ५ लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. महेश अंकुश उगले (वय ३६, ब. नं. २६३७) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी
तक्रारदाराची पत्नी झुंबा डान्स क्लास आणि जिम चालवतात. या क्लासमुळे त्रास होत असल्याचे सांगत काही नागरिकांनी क्लास तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांकडे केला होता. या अर्जाची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिस हवालदार महेश उगले याच्याकडे होती. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी उगले याने तक्रारदाराकडे ७ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत उगले याने सात लाख रुपयांच्या लाचेबाबत चर्चा केल्याचे, यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे तसेच उर्वरित पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

पाच लाख रुपये स्वीकारताच एसीबीची कारवाई
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने महेश उगले याला रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस हवालदार प्रवीण तावरे, पोलिस कॉन्स्टेबल आश्विन कमकर आणि चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!