BARAMATI CRIME : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचं बिंग फुटणार..? चार टाके पडतील एवढेच वार करायचे..? तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता

बारामती | न्यूज कट्टा

पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सुरुवातीला समोर आलेली माहिती, दाखल झालेली तक्रार आणि तपासादरम्यान पुढे आलेले मुद्दे यामध्ये प्रचंड विसंगती असल्याचे दावे केले जात आहेत. हा हल्ला नसून बनाव असल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती मिळत आहे.

दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघांनी हल्ला केला होता. याप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणा सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात आले असताना दुचाकीवरून दोघे जण त्यांच्याजवळ आले. आपण तुमचे चाहते आहोत, तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असं सांगत त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोटो काढण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या एका तरुणाने अचानक पिस्तूल काढून राणा यांच्यावर रोखलं. पण पिस्तूल जाम झाल्याने गोळी झाडता आली नाही. हा प्रकार लक्षात येताच राणा सूर्यवंशी यांनी हल्लेखोराच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे पिस्तूल खाली पडलं. त्यानंतर हल्लेखोराने धारदार शस्त्राने राणा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.

या घटनेवेळी राणा सूर्यवंशी यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून पोलीस कॉन्स्टेबलही उपस्थित होता. हल्ल्यानंतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अंगरक्षकाने एका आरोपीला पकडलंही; मात्र आरोपीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि तिथून पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो शेताच्या दिशेने पळून गेला, तर दुसरा आरोपी दुचाकीवरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. विविध पथकांच्या मदतीने तपासाची चक्रं वेगाने फिरवण्यात आली. दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. चौकशीदरम्यान ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली होती.

चालकाकडे सुपारीसाठी पैसे कसे..?

या घटनेनंतर अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. त्याचवेळी हा बनाव तर नाही ना..? असाही सवाल उपस्थित केला जात होता. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ज्ञानदेव शिंदे हा पूर्वी झोळ कुटुंबाकडे कार्यरत होता. मात्र मागील तीन वर्षांपासून तो राणा सूर्यवंशी यांच्यासाठी काम करत होता. अचानक त्याच्याकडे इतके पैसे कसे आले असाही प्रश्न आहे. त्याचवेळी त्याला राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करायची सुपारी मिळाली होती, तर त्याने आपल्या मालकाला किंवा अन्य कुणा व्यक्तीला का सांगितले नाही..? अशीही शंका उपस्थित होते.

गोळीबाराबाबत संभ्रम

या प्रकरणाच्या तक्रारीत गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, घटनेनंतर पोलिसांनी गोळीबाराचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिस्तूल, गोळी आणि सत्तूर सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. प्रत्यक्षात गोळीबार झाला किंवा नाही याबाबत स्पष्टता देण्यात आली नसली तरी प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार इथे कोणताही गोळीबार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात गोळीबाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

चार टाके आणि हल्ल्याचं प्लॅनिंग

या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्ला करताना तीन-चार टाके पडतील अशीच जखम झाली पाहिजे अशा सूचना हल्लेखोरांना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळं हा हल्लाच प्लॅनिंग करून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. एरवी घडलेल्या घटना पाहिल्यास हल्ल्याची पद्धत वेगळी असते. मात्र बारामतीत घडलेला हा हल्लाच संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून सगळं काही प्लॅन करून घडवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

राणा सूर्यवंशी आणि दत्तकला कनेक्शन

या प्रकरणात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेशी संबंधित रामदास झोळ यांच्या कुटुंबाचे नाव चर्चेत आले आहे. राणा सूर्यवंशी हे काही काळ या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर संस्थेतील मतभेदांमुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. दरम्यानच्या काळात मनोहरमामा भोसले प्रकरणात रामदास झोळ यांच्याविरोधात सोलापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. झोळ कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले असून त्यामागे राणा सूर्यवंशी यांची भूमिका असल्याचा आरोप करणारा अर्ज रामदास झोळ यांच्या सासू कौशल्यादेवी लालासाहेब जगताप यांनी पोलीस महासंचालकांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच झालेल्या हल्ल्यात झोळ कुटुंबीयांचं नाव आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अशी कोणतीही संशयास्पद बाब हाती लागली नसल्याची माहिती मिळत आहे.

राजकीय उद्देशाची चर्चा

एकूणच राणा सूर्यवंशी प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत असून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात बनाव रचल्याचा संशय बळावत असून पोलिसांकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, राजकीय प्रवेशाच्या अनुषंगाने चर्चा घडावी या उद्देशानं हे सगळं घडवलं गेल्याचीही चर्चा आहे. असं असलं तरी सध्या समोर येत असलेल्या पुराव्यावरून करायला गेलो एक आणि घडलं भलतंच अशीच संबंधितांची अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या प्रकरणाची सत्यता कधी समोर आणली जाते याकडेच लक्ष लागले आहे.

हल्ला प्रकरणाबाबत काही शंका

 १. सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे होती? राणा सूर्यवंशी यांना वाय किंवा वाय-प्लस सुरक्षा मंजूर होती का? असल्यास, हल्ल्याच्या वेळी सुरक्षारक्षक त्यांच्यासोबत का नव्हते?

२. सुरक्षा व्यवस्था काही अंतरावर का थांबली? हल्ल्यापूर्वी सुरक्षा पथक मागे थांबवण्याचा निर्णय कोणी आणि कोणत्या कारणासाठी घेतला?

३. सुरक्षारक्षकांची संख्या किती होती? त्यांच्यासोबत १२ जवान असल्याचा दावा खरा आहे का? एवढे जवान तैनात करण्यास अधिकृत मंजुरी होती का?

४. हल्ल्याच्या ठिकाणी स्थानिक पोलीस का नव्हते? सुरक्षा व्यवस्थेच्या नियमानुसार संबंधित जिल्ह्यातील पोलिसांची नेमकी काय भूमिका होती?

५. प्रत्यक्षात गोळीबार झाला होता का? सुरुवातीच्या तक्रारीतील गोळीबाराचा उल्लेख आणि पोलिसांनी सुरुवातीला पुरावे न मिळाल्याचे सांगितल्याचा दावा यामध्ये नेमके तथ्य काय आहे? दुसऱ्या दिवशी काही वस्तू सापडल्याचा दावा असल्यास, तिचा फॉरेन्सिक अहवाल काय सांगतो?

७. चालकाला कटाची माहिती कधी मिळाली? या प्रकरणात अटकेत असलेला चालक ज्ञानदेव शिंदे याने २ लाख रुपयांची सुपारी देऊन हल्ला घडवल्याची प्राथमिक माहिती आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून सूर्यवंशी यांच्याकडे काम करत होता. मग त्याला हल्ल्याची पूर्वकल्पना असताना त्याने  पोलिसांना किंवा राणा सूर्यवंशी यांना त्याबाबत माहिती का दिली नाही..?

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!