मुंबई : न्यूज कट्टा
मुंबईकडे जाताना वेळेची बचत व्हावी आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये यासाठी अटल सेतूची निर्मिती करण्यात आली. मात्र मागील काही दिवसात या अटल सेतूवरुन उडी मारून आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आजही एका ५० वर्षीय शिक्षकाने अटल सेतूवरुन जात असताना मध्येच कार थांबवली आणि या सेतूवरुन उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
वैभव इंगळे असं या शिक्षकाचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. इंगळे हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ते आपल्या कारमधून अटल सेतूवर आले. त्यांनी आपली कार मध्येच थांबत थेट पूलावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वैभव इंगळे यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, वैभव इंगळे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अटल सेतूवरुन उडी मारत आत्महत्येच्या घटना मागील काही दिवसांत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होत आहे.





