वडगाव निंबाळकर : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही.
रवींद्र आनंदराव गार्डी असं या आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवले होते. आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तो पोलिस कोठडीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून या आरोपीने आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, या प्रकरणी आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत.




