BIG BREAKING : प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामतीत मतदानाला ज्येष्ठ नेते शरद पवार गैरहजर राहणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं केलं आवाहन

बारामती : न्यूज कट्टा

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा मतदान करता येणार नसल्याची खंत व्यक्त केली आहे. १९६७ पासून प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या शरद पवारांना यावेळी प्रथमच मतदानापासून दूर राहावे लागत आहे. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.

स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी व अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बारामतीत येऊन मतदान करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले असून डॉक्टरांनी प्रवासास सक्त मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘अत्यंत व्यथित आणि जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. बारामतीकर नागरिक, मतदार आणि कार्यकर्ते माझी अडचण समजून घेतील, याची मला खात्री आहे,” असे शरद पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. “स्व. अजित पवार यांना ही आमच्याकडून श्रद्धांजली आहे. बारामतीतील सर्व मतदारांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच, निवडणूक आयोगाच्या पर्यायी मतदान सुविधांचा देखील आढावा घेतला. मात्र, अशा सुविधा उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आल्याने नाईलाजाने मतदानास गैरहजर राहण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीकरांनी आपल्या या आवाहनास प्रतिसाद देऊन सुनेत्रा पवार यांना मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!