BARAMATI BREAKING : खोटे वारसदार, बनावट मृत्यू दाखले आणि खरेदी खताच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री; बारामती तालुका पोलिसांकडून १५ जणांवर गुन्हा दाखल

बारामती : न्यूज कट्टा

खोटे वारसदार, बनावट मृत्यू दाखले आणि खरेदी खताच्या आधारे बारामती शहरानजीक असलेल्या रुई येथील तब्बल 92 गुंठे जमिनीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जमिनीच्या मूळ मालकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर बारामती तालुका पोलिस ठाण्यात खरेदीदारासह  बनावट वारस आणि साक्षीदार अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बारामतीत एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पांडुरंग बाबुराव शिंदे (वय ७०, रा. रुई, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नर्मदा पांडुरंग शिंदे, सरोज नीलेश दवणे, वंदना पांडुरंग शिंदे, जयवंती लक्ष्मण शिंदे, ज्योत्सना लक्ष्मण शिंदे, सागर लक्ष्मण शिंदे, प्रकाश रामदास शिंदे, प्रमोद रामदास शिंदे, स्वाती रामदास शिंदे (सर्व रा. अर्नाळा बंदरपाडा, ता. वसई, जि. पालघर), भाऊसाहेब बापूराव भोसले, संतोष भाऊसाहेब भोसले, अर्चना संतोष भोसले, चैतन्य संतोष भोसले, शिवाजी संतोष भोसले (सर्व रा. कसबा, बारामती) आणि सचिन अशोक खरात (रा. गुणवडी, ता. बारामती) या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग शिंदे यांच्या आई कै. बकुळाबाई बाबुराव शिंदे यांनी रुई येथील गट नं. २३ मध्ये ९२.२५ गुंठे जमीन १८ ऑक्टोबर १९६५ रोजी खरेदी केली होती. त्यांच्या निधनानंतर पांडुरंग शिंदे यांचे वारस म्हणून नाव नोंदवण्यात आले होते. २०२२ मध्ये शिंदे यांनी कर्ज घेण्यासाठी म्हणून या जमिनीची कागदपत्रे काढली असता ती जमीन भाऊसाहेब भोसले, संतोष भोसले, अर्चना भोसले, चैतन्य भोसले यांच्या नावावर झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या जमिनीचे खरेदीखत काढल्यानंतर सण २०२१ मध्ये नर्मदा शिंदे, सरोज दवणे, वंदना शिंदे, जयवंती शिंदे, ज्योत्सना शिंदे, सागर शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद शिंदे, स्वाती शिंदे यांच्या वारस नोंदी लावून त्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे ही जमीन विकल्याचे निदर्शनास आले.

याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर संबंधितांनी पांडुरंग शिंदे हे एकमेव वारस असताना लक्ष्मण बाबुराव शिंदे, रामदास बाबुराव शिंदे आणि कमल बाबुराव शिंदे ही खोटी भावंडे दाखवल्याचे समोर आले. त्यासाठी आरोपींनी वसई आणि बारामती न्यायालयाची दिशाभूल करत शिंदे यांच्यासह त्यांच्या कथित भावंडांच्या मृत्यूची नोंद होऊन दाखला देण्याचे आदेश मिळवले. त्यानुसार बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे जोडून संबंधित जमिनीवर नोंद लावून घेतली. त्यानंतर त्यांनी सन २०२२ मध्ये या जमिनीचा व्यवहार करून ती संतोष भोसले व अन्य लोकांच्या नावे करण्यात आली.

आई आणि मुलीच्या जन्मात ११ वर्षांचा फरक..?

या प्रकरणात पांडुरंग शिंदे यांच्या खोट्या पत्नी, मुली आणि भावंडे दाखवण्यात आली आहेत. यामध्ये त्यांची खोटी पत्नी नर्मदा शिंदे आणि मुलगी वंदना या दोघींच्या कागदपत्रात नमूद जन्मतारखांमध्ये ११ वर्षांचा फरक दाखवला आहे. त्याचवेळी कथित भावाच्या मुलांमध्ये प्रमोद आणि स्वाती यांच्या जन्म तारखेत ३ महिन्यांचा फरक नमूद केला आहे. त्यामुळं ही जमीन लाटण्यासाठी बनावट मृत्यू दाखले, बनावट आधार कार्डचा वापर केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

आरोपी अद्याप अटक नाही

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात १५ जणांवर भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ३५१ (२), ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम पवार करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी दि. ९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळं पोलिसांकडून या प्रकरणाचा धीम्या गतीने तपास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!