BARAMATI BREAKING : बारामतीत सायबर चोरट्यांनी नामांकित डॉक्टरला घातला गंडा; गिरीराज हॉस्पिटलच्या खात्यातून ९२.५० लाख लंपास

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच आणखी एक मोठी फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात सायबर चोरट्याने गिरीराज हॉस्पिटलशी संबंधित खात्यांमध्ये घुसखोरी करत तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार, संबंधित आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बँकिंग सिस्टीममध्ये प्रवेश मिळवत दोन वेगवेगळ्या खात्यांमधून मोठ्या रकमेचे व्यवहार केले. एका खात्यातून ४८ लाख रुपये तर दुसऱ्या खात्यातून ४४ लाख ५० हजार रुपये अशा एकूण ९२.५० लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली. ही संपूर्ण रक्कम काही मिनिटांतच इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याने हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे.

प्राथमिक तपासात हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असून, आरोपीने फिशिंग, बनावट लिंक किंवा इतर तांत्रिक माध्यमांचा वापर केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात असून, व्यवहारांचा डिजिटल मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बँक खात्यांची माहिती, व्यवहाराची वेळ, आयपी अ‍ॅड्रेस आणि पैसे ज्या खात्यांमध्ये वळवण्यात आले, त्यांचा तपशील तपासण्यात येत आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयास्पद कॉल, मेसेज किंवा लिंकपासून दूर राहावे आणि कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!