BARAMATI ACCIDENT : सकाळी निरोप समारंभ, दुपारी देवदर्शनावरून परतताना अपघात; अपघातात साखरवाडीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बारामती : न्यूज कट्टा

सकाळी शाळेतील दहावीचा निरोप समारंभ उरकून देवदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. देवदर्शन करून परतताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात साखरवाडी येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत असलेले दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. बारामती तालुक्यातील मूर्टी येथे ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रतीक अंतु मोरे (वय १६, रा. साखरवाडी) असं या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर त्याच्यासोबत असलेले आदित्य राऊत आणि शिवम काळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रतीक मोरे हा फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे दहावीत शिकत होता. आज त्याच्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

शाळेतील निरोप समारंभ उरकल्यानंतर प्रतीक आणि त्याचे आठ ते दहा मित्र दुचाकीवरून जेजूरी, मोरगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. जेजूरी येथील खंडेरायाच्या दर्शनानंतर हे सर्वजण मोरगाव येथे गणरायाचे दर्शन घेऊन साखरवाडीकडे परत निघाले होते. मूर्टी येथील आश्रमशाळेजवळ असलेल्या वळणावर प्रतीक आणि त्याचे मित्र जात असलेली दुचाकी घसरल्याने ते दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये प्रतीकच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शाळेतील निरोप समारंभानंतर देवदर्शनासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साखरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!