मुंबई : न्यूज कट्टा
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधात राहून कामे होत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षात जाणंच योग्य राहील अशी भूमिका घेत शरद पवार गटातील आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा स्वीकारल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासोबत प्रमुख नेत्यांसह चाळीसहून अधिक आमदारांच्या पाठिंब्यावर युती सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता खेचून आणली. अजितदादांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा अजितदादांकडेच आली आहे. तर शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत केवळ १० जागांवर विजय मिळवता आला.
राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही आमदारांचा सत्तेत जाण्यासाठी आग्रह असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याचवेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत नव्या पिढीकडून विचार होऊ शकतो असेही म्हटले होते. मागील काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. योगायोगाने या काळात शरद पवार आणि अजितदादा अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचंही पाहायला मिळालं.
दरम्यान, आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ असल्याची माहिती पुढे आली आहे. विरोधात राहून कामेच होत नाहीत, त्यामुळे सत्ताधारी पक्षात गेलेलंच बरं असा विचार करत काही आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा स्वीकारल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





