दौंड : न्यूज कट्टा
मुलांना शेतातून घरी सोडायला जाताना पाऊस आला म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शेतकऱ्याचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे शुक्रवारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय जगन्नाथ जगताप (वय ५५) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय जगताप यांच्या शेतात फ्लॉवर पिकाची तोडणी सुरू होती. त्यामुळे मजुरांसह कुटुंबातील सदस्यही शेतात आलेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जगताप हे आपल्या मुलांना सोडण्यासाठी घरी गेले होते. घराकडून परतत असताना अचानक जोराचा पाऊस आला. त्यामुळे जगताप हे रस्त्याच्या कडेला थांबले. त्यावेळी अचानक वीज त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बोरीपार्धी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जगताप यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भावजय, आई-वडील असा परिवार आहे.





