अकलूज : न्यूज कट्टा
अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये ऑक्टोपस राईड घेताना झालेल्या दुर्घटनेत भिगवण येथील युवा उद्योजक तुषार शशिकांत धुमाळ यांचा दि . १८ जून रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर अकलूज पोलिसांनी संबंधित वॉटरपार्कच्या व्यवस्थापक, ऑपरेटर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार दि. १८ जून रोजी तुषार धुमाळ हे आपल्या मित्रांसह सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये गेले होते. त्या ठिकाणी ऑक्टोपस राईडसाठी ते पाळण्यात बसले होते. ही राईड सुरू झाल्यानंतर तुषार आणि त्यांचे मित्र बसलेला पाळणा अचानक तुटला आणि जमिनीवर पडला. यामध्ये तुषार धुमाळ यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर जखम झाली. तसेच त्यांच्या कानातूनही रक्तस्त्राव झाला. त्यानंतर तुषार धुमाळ यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत वैभव आप्पा रुपनवर (रा. डोंबाळवाडी, माळशिरस) हेही जखमी झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी तुषार यांचे भाऊ अभिजीत शशिकांत धुमाळ (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सयाजीराजे वॉटरपार्कचे व्यवस्थापक, ऑपरेटर आणि संबंधित विभागातील कर्मचारी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), ३ (५) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाळण्याचे अनेक भाग खिळखिळे झाले असून दैनंदिन तपासणी होणे आवश्यक असताना ती केली नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, तुषार धुमाळ हे भिगवणमधील उद्योजक होते. एलआयसी व्यवसायात त्यांनी स्वत:चा नावलौकीक मिळवला होता. त्यांच्या अपघाती निधनाने भिगवणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अधिक तपास अकलूज पोलिस करत आहेत.





