SOLAPUR CRIME : नात्यातील संशय अन् ब्रेकअप; सोलापूरातील युवक-युवतीच्या आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट

सोलापूर : न्यूज कट्टा

सोलापूर शहरातील कर्णिकनगर येथे एका युवक-युवतीने एकाच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. १९ जून रोजी समोर आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला असून नात्यातील संशय आणि ब्रेकअपनंतर या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. आमच्या नात्याला वेगळा अर्थ लावू नका अशी विनवणी करतानाच एका युवतीमुळे आपण आत्महत्या करत आहोत असंही या चिठ्ठीत म्हटलं आहे.

कर्णिकनगर परिसरात एका घरात रोहित ऊर्फ ऋग्वेद भीमू ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३) या दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झाली असावी असा संशय व्यक्त होत असतानाच या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. हे दोघेही एकमेकांना भाऊ बहीण मानत असल्याची बाब समोर आली आहे.

अश्विनीचे एका आदित्य नावाच्या मुलावर प्रेम होते. पाच वर्षांपासून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचाही ब्रेकअप झाला होता. आदित्य हा रोहित याचा बालपणापासूनचा मित्र होता. अश्विनी आणि आदित्य यांच्यातील प्रेमसंबंधांची त्याला माहिती होती. रोहित हा अश्विनीला बहीण मानायचा. आदित्यसोबत अश्विनीचा झालेल्या ब्रेकअपमुळे रोहितही दुखावला होता.

आत्महत्येच्या दिवशी रोहित आणि अश्विनी भेटले. त्यावेळी अश्विनीने आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर अश्विनीचा मृत्यू झाल्यावर आपण तरी जगून काय करणार या विचारातून त्याने तिच्यासोबत स्वत:लाही संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘आम्ही दोघं बहीण-भाऊ आहोत. आई-मुलगा आहोत. आम्हा दोघांना मेलेले बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतं. त्यामुळे सगळ्यांपासून लांब चाललो, आमच्या दोघांच्या नात्याचा कोणीही वाईट अर्थ लावू नका. आम्हाला बघितल्यावर पहिले आदित्यला बोलवा. कारण आम्ही कोण आहोत, हे फक्त तोच सांगू शकतो. माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून जीवन नको म्हणून आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

जिवंत असताना आम्हाला खूप जणांनी लांब करण्याचा प्रयत्न केला. पण मेल्यावर तरी आम्हाला सोबत जाळा. आदि तुला वाटतं तसं नैना चांगली नाही. ती कशी आहे ना ते तू एकदा स्वतः पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झाला ना, त्या भांडणात आम्ही जे बोललो ते खरं होतं. ते तुला नंतर कळेल. Best of luck aadi for your future. तसंच माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले. जगण्याची इच्छा मेली होती.

vivo फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत, ते फक्त पोलीस ऐका, आणि त्या मुलीला बोलावून विचारा. आणि आमच्या मरण्याचे कारण पण तीच आहे. कारण तिने मला आणि आदिला लांब केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी. आदि जाता जाता लास्ट टाईम तुला एक सांगते, आदि सत्य कडू असतय. एवढं लक्षात ठेव. मी मेलावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा. पप्पा मम्मी मी मरत आहे. कारण मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आदिची यात काहीच चूक नाही. असा मजकूर या चिठ्ठीत नमूद करण्यात आला आहे. या चिठ्ठीमुळे या प्रकरणात नवीनच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!