बारामती : न्यूज कट्टा
कोणताही विषय आला की सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं जातं. वास्तविक सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. त्यामुळं कोणताही मुद्दा उपस्थित करताना केवळ अजितदादांना दोष कशाला असा सवाल करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांनी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आपला मूळ मुद्दाच बाजूला राहील याचा विचार करण्याचा सल्ला आंदोलकांना दिला आहे.
किशोर मासाळ यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. किशोर मासाळ आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, काल परवापासून एक नवीन बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे की ओबीसींची वस्तीग्रह बांधण्यासाठी नवीन जागा ही पुणे शहराच्या बाहेर लोहगाव परिसरामध्ये सरकार हस्तांतरित करणार आहे असे समजत आहे. वास्तविक पाहता सारथीचे वस्तीग्रह हे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे डेक्कन-औंध परिसरात होत आहे; परंतु काही दिवसांपूर्वी #अजितदादांचं एक भाषण पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे या ठिकाणी ऐकलं…..
त्यावेळेस दादा बोलताना असं बोलले की आयोजकांनी मला धनगर समाजासाठी एक वस्तीगृह मागितले आहे, परंतु मी नेहमीच सांगत आलेलो आहे की मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार आहे, चव्हाण साहेबांची संस्कृती घेऊन पुढे जात आहे,त्याचबरोबर कॅबिनेटच्या बैठकांमध्ये मी अशा पद्धतीचे प्रस्ताव आले तर मी त्याला कडाडून विरोध करतो माझा एक वैयक्तिक शेरा त्याबाबतीत मी असा देतो की सर्वच जाती-धर्माची मुलं जर एकाच वस्तीग्रह मध्ये राहिली तर समाजामध्ये एकोपा वाढेल आपली संस्कृती टिकून राहील मुलांमध्ये अशी भावना तयार होणार नाही की हा मुलगा इथे राहतो, तो मुलगा तिथे राहतो, तो अमुक जातीचा अमुक धर्माचा आहे, खरंच दादांचे हे भाषण ऐकलं आणि मनापासून भारावून गेलो की आपल्या नेत्याचे विचार एवढे प्रगल्भ आहे,आपला नेता खऱ्या अर्थाने जातीवादाला मूठ माती देऊन सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी सक्रिय आहे,याचा अभिमान वाटला.परंतु याच्याच उलट ज्या ज्या वेळेस ओबीसींचे नेते म्हणून #लक्ष्मण_हाके महाराष्ट्र मध्ये काम करत असतात व ते ज्यावेळेस प्रखर टीका आमचे नेते अजित दादांवर करतात त्यावेळेस मनाला प्रचंड वेदना होतात.
परंतु ज्या ज्या वेळेस हाके सर काही गोष्टी निधीच्या बाबतीत किंवा वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांच्या सोयींबाबत फेलोशिपच्या निधी बाबत बोलत असतात त्यावेळेस हाके सरांचे अनेक मुद्दे मनाला पटतात. परंतु त्याच वेळेस हे जे काही वेगवेगळे आंदोलक आहेत ते फक्त अजित दादांना टार्गेट करतात. सरकारमध्ये अजित दादा हे घटक आहेत सरकार हे फडणवीस-शिंदे-अजितदादा या तीन पक्षांचे मिळून सरकार बनलेलं आहे आणि वास्तविक ज्यावेळेस हे निर्णय मुंबईच्या कॅबिनेटमध्ये होत असतात त्याच वेळेस वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रतिनिधी म्हणून यांच्या पक्षांनी त्यांना मंत्री म्हणून संधी दिली असते ते लोक या निर्णयांना त्या ठिकाणी विरोध का करत नाहीत?? त्यांचं मत ते त्या ठिकाणी ठामपणे का मांडत नाहीत??? ते लोकप्रतिनिधी या होणाऱ्या अधोगतीला जबाबदार आहेत.
ज्या पुणे शहराला विद्येचे माहेरघर बोललं जातं पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःची जमीन पुण्याच्या बाहेर असताना त्या ठिकाणी वसतिगृह शाळा उभे न करता पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा वस्तीग्रह उभा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विचारांचा पुणे शहराला वारसा आहे तोच वारसा पुसून टाकत पुन्हा एकदा ओबीसींची, मागासांची,माळी, धनगरांची, वंजारी पारधी,कैकाडी मायक्रो ओबीसींची मुलं शहराच्या बाहेर 20-20 किलोमीटर वस्तीगृहात राहणार आणि पीएमटी च्या चार बस बदलून तीन तासाचा प्रवास करून सातचं लेक्चर पकडायला फर्ग्युसनला, बीएमसीला, गरवारेला, मॉडर्न,सीओईपी,जीपीपी,एग्रीकल्चर कॉलेजला,एमपीएससीच्या अभ्यासाला कधी पोहोचणार??? हाच प्रश्न उभा राहत आहे. सरकारमध्ये असं कोण आहे की ज्याला पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागा दिसत नाहीत, त्याला दिसत नसतील तर आम्ही दाखवून देऊ. फक्त एकट्या आमच्या दादाला टार्गेट करू नका. जर आंदोलकांमध्ये प्रामाणिकपणाची भावना असेल तर सरकारमधील सर्वांनाच या विषयावर धारेवर धरा, जाब विचारा, त्याबरोबरच जे जे कोणी मंत्री आमदार निवडून गेले आहेत त्यांच्या देखील नावाचा उद्धार या पुढील कालावधीत केला पाहिजे. एकाला कोणाला टार्गेट करायचा आणि आपला मूळ मुद्दा मागे पडायचा आणि आपले जे काही लोक या पुढील कालावधीमध्ये मूग गिळुन गप्प बसणार असतील तर त्यांचा देखील विचार करायला हवा…..
क्या बोलती पब्लिक?
किशोर अप्पासाहेब मासाळ
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य.





