मुंबई : न्यूज कट्टा
महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. तब्बल १७,४५० जागांसाठी चालक, वाहक व सहाय्यक पदांची भरती केली जाणार असून यासाठी दिवाळीपूर्वी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या काही महिन्यांपासून एसटीमध्ये चालक-वाहकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. अनेक वेळा बससेवा बंद पडणे, गाड्या उशिरा धावणे, प्रवाशांना होणारा त्रास याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांसाठी होणार असून चालक, वाहक आणि सहाय्यक अशा तिन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी २ ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
३० हजारांपेक्षा अधिक वेतनाची हमी
कंत्राटी पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांना किमान ३० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो युवक-युवतींना चांगला रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.सध्या एसटीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. अनेक चालकांना सलग फेऱ्या कराव्या लागत आहेत. ही भरती पूर्ण झाल्यानंतर एसटीच्या बससेवेत सुधारणा होईल, प्रवाशांना वेळेवर सेवा मिळेल आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी
राज्यातील बेरोजगारांसाठी ही मोठी संधी असून आगामी काळात अर्ज कसा करायचा, पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणाचे प्रमाण इत्यादी बाबतची सविस्तर जाहिरात एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली जाणार आहे.





