BARAMATI POLITICS : जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगूल वाजलं; बारामतीत राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांचं गुडघ्याला बाशिंग, अंतिम निर्णय अजितदादांचा..!

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा  

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. बारामतीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी गाठीभेटींना सुरुवात केली आहे. तर कधीही लोकांच्यात न दिसणारेही आता गर्दी दिसेल तिथे थांबू लागले आहेत. अर्थात शेवटी काहीही झालं तर उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय अजितदादाच घेणार आहेत.

बारामतीत जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यातील पणदरे, निंबूत हे  जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहेत. तर वडगाव निंबाळकर गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तसेच सुपे गट इतर मागास महिला राखीव, गुणवडी गट अनुसूचित जाती महिला राखीव आणि निरावागज गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

पणदरे आणि निंबूत हे दोनच गट खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या गटांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे जिल्हा परिषदेत वर्णी लागल्यास अध्यक्षपदाची संधी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. त्यानंतरच उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळं अनेकांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत संधी मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक लोकांमध्ये फिरू लागले आहेत. कधीही लोकांच्यात नसलेले चेहरे आता लोकांची गर्दी दिसेल तिथे जाऊन मीच कसा भारी हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एकूणच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडील इच्छुकांची गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

गावात पत नसलेले उमेदवार नकोच

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर लोकसभा आणि त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात अजितदादांना यश मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरता येणारा नाही. त्यामुळंच ज्यांच्या गावातही घड्याळाला मतदान मिळवता आलं नाही अशा इच्छुकांना उमेदवारी न देण्याची मागणी सर्वसामान्य कार्यकर्ते करत आहेत.

गोडबोल्यांना बाजूलाच ठेवा  

जिल्हा परिषद गटांचा आढावा घेतल्यास अनेकजण उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. प्रत्यक्षात मात्र पक्षाशी प्रामाणिक, सामान्यांमध्ये मिसळणारे, जनतेच्या कामाला महत्व देणारे, कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध जपणारे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उतरवावेत अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. केवळ गोड बोलणारे, स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाचा आणि नेत्यांच्या नावाचा वापर करणारे, जनतेत नसणारे उमेदवार लादले जाऊ नयेत अशीही मागणी होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!