बारामती : न्यूज कट्टा
प्रजासत्ताकदिनी बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यामुळं सुपे येथे काही कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकली. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असतानाच सचिन सातव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आज घडलेली घटना ही काही लोकांच्या अज्ञानातून घडली असून त्याबद्दल आपण तक्रार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काल प्रजासत्ताकदिनी बारामती नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नव्हता. त्यावरून बहुजन संघटनांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता. त्यानंतर आज बारामती नगरपरिषदेसमोर आंदोलनही करण्यात आलं. याचदरम्यान, आज दुपारी नगराध्यक्ष सचिन सातव हे सुपे परिसरात गेले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्याचवेळी ही शाईफेकीची घटना घडली.
या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असतानाच सचिन सातव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आजची घटना ही काही लोकांच्या अज्ञानातून झालेली आहे. त्यामुळं याबद्दल माझी कसलीही तक्रार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काही अविचारी लोकांच्या कृतीमुळे आपल्यातील सामाजिक सलोखा बिघडू देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सचिन सातव यांनी आपल्या भावना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवल्या आहेत. यामध्ये ते म्हणतात, आपण सर्व व अवघा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिवस, धम्मचक्र परिवर्तन दिवस हे चार उत्सव साजरा करत असतो. या दिवशी त्यांना अभिवादन केले जाते. थोर समाजसुधारक, कायदेपंडित, प. पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असलेले योगदान अमूल्य, अतुलनीय, अविस्मरणीय, अजर आहे. त्यांच्यासारखा सामाजिक नेता या देशात न घडला, न घडणार.
ते पुढे म्हणाले, वास्तविक पाहता बारामती नगरपरिषद २६ जानेवारी व १५ ऑगस्ट हे राष्ट्रीय सण साजरे करीत असताना संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नेहमीच साजरे करीत असते व कालही ध्वज वंदनानंतर आपण सर्वांनी पुतळ्यास अभिवादन करून २६ जानेवारीचा राष्ट्रीय सण साजरा केला. आज माझ्या बाबतीत झालेली घटना काही लोकांच्या अज्ञानातून घडलेली आहे. माझी याबाबत कसलीही तक्रार नाही. तरी माझी आपणास कळकळीचे आवाहन की, काही अविचारी लोकांच्या कृतीमुळे आपल्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये.





