मुंबई : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी नव्याने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. दरम्यान, शपथविधी पार पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, अल्पसंख्यांक विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थखाते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. अतिशय भावूक वातावरणात आणि साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य, आमदार यावेळी उपस्थित होते.
अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब दु:खात आहे. याही परिस्थितीत भविष्यातील राजकीय गणितं लक्षात घेत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास होकार दिला. त्यानंतर आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी अजितदादांकडे असलेल्या अर्थ खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे. तर उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास व औकाफ या खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली आहे.





