प्रचंड दु:ख; पण दादांची स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द.. त्यामुळंच आता बारामती थांबणार नाही..!

न्यूज कट्टा स्पेशल

अजितदादा म्हणजे फक्त एक नेता नव्हते… ते बारामतीच्या विकासाबद्दल प्रचंड आत्मीयता असलेले कृतीशील व्यक्तिमत्व होते. कोणाचंही काम घेऊन दादांकडे गेलं की “होईल” हा शब्द पुरेसा असायचा, कारण त्या शब्दामागे कृतीची खात्री असायची. विकासकामातील बारकावे, अधिकाऱ्यांवरचा आदरयुक्त वचक, लोकांमध्ये मिसळून घेतलेला संवाद दादांची शैलीच वेगळी आणि दमदार होती. दादांची उंची गाठणं सोपं नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आज त्या उंचीसमोर ठामपणे उभं राहण्याचं धैर्य ज्यांच्यात आहे, त्या म्हणजे सुनेत्रा वहिनी.

दादांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी अनेक वर्षे दुसरी बाजू तितक्याच ताकदीने सांभाळली. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, समाजकारण आणि राजकारण प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक कुटुंबांची कामं त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली. अनुभव, लोकांशी असलेली नाळ आणि कामाची समज हे त्यांचं भक्कम भांडवल आहे.

काल सहकार क्षेत्रातील घेतलेली बैठक याचं ठोस उदाहरण ठरली. बारामतीचं सहकार क्षेत्र म्हणजे हजारो कुटुंबांचा आधार. शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक सगळ्यांचं अर्थकारण त्यावर उभं आहे. दादांनी जशी मजबूत पकड ठेवली होती, तशीच दिशा कायम ठेवण्याचा निर्धार वहिनींनी स्पष्टपणे दाखवून दिला. सहकाराचा गाडा रुळावरून घसरणार नाही… विश्वास तुटू देणार नाही… आणि बारामतीचं अर्थकारण अधिक भक्कम करणार हा संदेश त्या बैठकीतून स्पष्ट गेला.

त्याचबरोबर काल झालेला जनता दरबारही खूप काही सांगून गेला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना समोर बसवून नागरिकांची निवेदनं प्रत्यक्ष स्वीकारली. जी कामं जागेवर निकाली निघू शकत होती, ती तात्काळ सोडवली. आणि जी प्रशासन पातळीवर निर्णय घेण्यासारखी होती, त्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट, ठाम आणि वेळबद्ध सूचना दिल्या.

काम फक्त ऐकून घेणं नाही, तर ते कृतीत उतरवणं ही त्यांची शैली आहे. हीच पद्धत पाहून लोकांना दादांची आठवण झाली… आणि तितकाच विश्वास वहिनींवरही दृढ होताना दिसला. स्पष्ट बोलणं, योग्य निर्णय घेणं, कामाला गती देणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यात त्यांची ठाम भूमिका दिसते. आज वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्या ज्या धैर्याने पुढे येत आहेत, ते पाहून लोकांच्या मनातला संभ्रम दूर होत आहे.

दादांची धमक वेगळी होती… हे मान्यच. पण वहिनींच्या ठाम पावलांतून आता स्पष्ट जाणवतं बारामती कमी पडू देणार नाहीत. दादांचं स्वप्न अर्धवट राहू देणार नाहीत. सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती तशीच राहील… किंबहुना अधिक वेगाने पुढे जाईल. बारामतीकरांच्या मनात आज नेतृत्व बदललं असेल, पण विश्वास तसाच आहे आणि हा विश्वास पुढे नेण्याची ताकद वहिनींकडे आहे ही भावना निर्माण झाली आहे. त्यामुळंच सांगावंसं वाटतं, आता आपली बारामती थांबणार नाही..!

शब्दांकन : अमोल कावळे, नगरसेवक, बारामती नगरपरिषद

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!