बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची नि:पक्ष आणि जलद गतीने चौकशी व्हावी या मागणीसाठी उद्या सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी बारामतीकरांच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. बारामती येथील प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता बारामतीकरांकडून हे निवेदन दिले जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दि. २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जलद गतीने तपास होऊन अपघातामागील कारण पुढे येणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात मात्र या घटनेला तब्बल एक महिना उलटत आला तरी अद्यापही अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं हा अपघात होता की घातपात अशा शंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत.
अजितदादांचं अकाली जाणं हे बारामतीकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारं आहे. भविष्याचा वेध घेऊन काम करणाऱ्या या नेतृत्वाच्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्याची उत्तरे अद्याप जनतेला मिळालेली नाहीत. त्यामुळंच हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बारामती येथील प्रांताधिकारी कार्यालयात बारामतीकरांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
अजितदादांच्या अपघाताची नि:पक्षपणे व जलद गतीने चौकशी करावी ही प्रमुख मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे केली जाणार आहे. त्यासाठी बारामतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बारामतीकरांच्या एकतेची आणि अजितदादांवरील प्रेमाची ताकद दाखवून द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.




