SPORTS COMPITITION : बारामतीत होणार राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा; अंबरनाथमध्ये हॉलीबॉल, नागपूरमध्ये कबड्डी आणि बीडमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन

मुंबई : न्यूज कट्टा  

यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल व खो-खो या खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्याला भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!