MANCHAR CRIME : आधी आईकडून मुलीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न; नंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारली, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मंचर : न्यूज कट्टा

आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात आज शुक्रवारी सकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात एका विवाहित महिलेने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून ती मृत झाल्याचा समज करून घेतला. त्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेत तिने जवळील विहिरीत उडी घेतली. या घटनेत सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून आई व मुलगी गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. तर परिज्ञा आशिष बाणखेले (वय १४) ही मुलगी गंभीर जखमी असून हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) या आईवरही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी साडेआठच्या सुमारास कौटुंबिक वादातून हर्षदा बाणखेले हिनं संतापाच्या भरात मुलगी परीज्ञाचा वायरीच्या सहाय्याने गळा आवळून मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचं समजून तिला घरातच बंद केलं. त्यानंतर तिने सहा वर्षांचा मुलगा नेहाल याला दुचाकीवर घेऊन तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीत जाऊन मुलासह स्वतः उडी मारली.

हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ दोघांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत नेहालचा मृत्यू झाला होता. तर हर्षदा बाणखेले ही जखमी अवस्थेत आढळून आली. दरम्यान, पती आशिष बाणखेले यांना घटना समजताच त्यांनी पत्नीला मुलगी परिज्ञा कुठे आहे, असा प्रश्न विचारला. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या हर्षदाने नंतर लालबाग प्राईड येथील घरात असल्याचे सांगून चावी दिली. त्या ठिकाणी घराचा दरवाजा उघडताच परिज्ञा अत्यावस्थ अवस्थेत आढळली.

तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर मंचर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!