पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून राहणारा नवनाथ गवळी याच्यावर महिलांची फसवणूक करून त्यांचा गैरफायदा घेतल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी एका महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनंतर हा भोंदू फरार झाला आहे.
याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘दोष काढून टाकतो’, ‘समस्या दूर करतो’ असे सांगून आरोपी महिलांना आश्रमात बोलावत असे. त्यानंतर त्यांच्याकडे अयोग्य आणि लाजिरवाण्या मागण्या करत असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. तसेच तिच्याशी अयोग्य वर्तन करून मानसिक छळ केल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
नवनाथ गवळी हा स्वतःला अध्यात्मिक शक्ती असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत होता. गावातील आणि परिसरातील अनेक महिला त्याच्याकडे विविध समस्यांवर उपाय मिळावा या अपेक्षेने जात होत्या. याच विश्वासाचा गैरफायदा घेत तो महिलांना जाळ्यात ओढत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला पीडित महिलेला भीती आणि समाजात बदनामी होईल या दबावामुळे तक्रार करणे शक्य झाले नाही. मात्र त्रास वाढत गेला आणि परिस्थिती असह्य झाल्यानंतर तिने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारे अध्यात्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. काहींनी तर अशा आश्रमांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी नवनाथ गवळी अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.





