BIG NEWS | इंदापूर तालुक्यात बेकायदेशीर मांगूर माशाची तस्करी; कारवाईनंतरही धंदा सुरूच, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे । न्यूज कट्टा      

मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या आणि केंद्र व राज्य सरकारने बंदी घातलेल्या मांगूर माशाची इंदापूर तालुक्यातील कालठण परिसरात बेकायदेशीरपणे तस्करी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरात विविध शेततळ्यांमध्ये मांगूर माशाचे बीज टाकून संगोपन केले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळं थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पर्यावरण मंत्री पांकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मांगूर माशाला बंदी घातली आहे. परंतु तरीही इंदापूर तालुक्यातील कालठण परिसरात या माशाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या भागात विविध शेततळ्यात मांगूर माशाचे बीज सोडण्यात येत असून ते पुढे राज्यासह परराज्यात पाठवले जात असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मांगूरच्या तस्करी व बीज निर्मितीबाबत तक्रारी केल्यानंतर मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून ६ ऑगस्ट २०२५ रोजी या भागात पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये मांगूर माशाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार मत्स्य व्यवसाय विभागाकडून संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच काहीजणांवर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच पुन्हा मांगूर माशाच्या तस्करीचे प्रकार सुरू झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

मीच किंग, मला कशाची भीती         

कालठण परिसरातील या बेकायदेशीर व्यवसायामागे एका प्रभावशाली व्यक्तीचा हात असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आर्थिक बळ आणि काही अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित संगनमताच्या जोरावर संबंधित व्यक्ती कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता हा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मांगूर तस्करी प्रकरणातील कथित सूत्रधार, त्याच्या सहकाऱ्यांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मोहसीन पठाण यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!