सोलापूर । न्यूज कट्टा
अंधश्रद्धा, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करून मिळवलेल्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या प्रकरणात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांना आरोपी करण्यात आले आहे. भोंदूगिरीतून आलेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी रामदास झोळवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यासह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात अंधश्रद्धा व अघोरी पूजेच्या माध्यमातून अनेकांची कथित फसवणूक करण्यात आल्याचे तसेच त्यातून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी दत्तकला इन्स्टिट्यूटचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ मामा भोसले याने अंधश्रद्धा, अनिष्ट-अघोरी प्रथा व जादूटोणा अशा प्रकारांच्या माध्यमातून अनेक पीडितांची फसवणूक केली. या कथित गैरप्रकारातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यवहारात संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ याच्यामार्फत कथितरित्या पैशांची विल्हेवाट लावली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या संस्थेतील अन्य व्यक्तींनाही तपासाच्या कक्षेत घेण्यात आले आहे. पोलिसांनी रामदास झोळ याचा शोध सुरू केला असून, त्याच्या भूमिकेबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दोघांना अटक; १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात रामदास झोळ याच्यासह आरोपी करण्यात आलेल्या राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दत्तकला इन्स्टिट्यूटमधील तपासणीदरम्यान महत्त्वाच्या नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. संस्थेच्या यापूर्वीच्या व्यवहाराशी संबंधित रजिस्टर, कॉम्प्युटर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, त्यामधून या प्रकरणातील अन्य संशयितांची माहिती शोधण्याचे काम सुरू आहे.
२३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल
कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष पथकाने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण २३ आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी नावे समोर येण्याची शक्यता
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संस्थेतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या तपासातून या प्रकरणातील अन्य आरोपी किंवा संबंधित व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.





