BIG BREAKING : पेरूचा बहाणा अन् लैंगिक अत्याचारानंतर गळा दाबून हत्या; पिंपळवंडीतील ‘त्या’ चिमूकलीसोबत काय घडलं..? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पुणे । न्यूज कट्टा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पेरू देण्याच्या बहाण्याने शेताच्या दिशेने घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणावर केला आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संहिल संपत खैरे (वय २१) असं या नराधमाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी संबंधित चिमुकली घरातून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक तसेच ग्रामस्थांकडेही तिच्याबाबत चौकशी करण्यात आली. याचदरम्यान काही नागरिकांनी ती एका तरुणासोबत दिसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी उपलब्ध माहिती, घटनास्थळ आणि इतर बाबींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत २५ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपीने चिमुकलीला पेरू देण्याच्या बहाण्याने शेताच्या दिशेने नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील नेमकी परिस्थिती, गुन्ह्यामागील कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. घटनास्थळावरील पुरावे, संबंधित व्यक्तींची माहिती तसेच इतर महत्त्वाच्या बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. आरोपीविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील बंद असलेल्या पोलीस चौकीचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावात नियमित पोलीस उपस्थिती नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस चौकी पुन्हा सुरू करून गावात पोलिसांची नियमित गस्त आणि उपस्थिती वाढवावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि तपासातील बाबींच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि चिमुकलीला न्याय कधी मिळणार, याकडे पिंपळवंडीसह संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!