CRIME BREAKING : अकलूज पोलिसांकडून बंदुकीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक नाही, दोन नाही तब्बल १७ पिस्तुले अन् ४७ काडतुसे जप्त, सहाजणांना अटक

अकलूज । न्यूज कट्टा

विना परवाना अग्निशस्त्रे बाळगून त्याची विक्री करणाऱ्या टोळीविरोधात अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार, असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, काही आरोपी फरार असल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी अकलूज पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत विकास कैलास वजाळे हा टाटा नेक्सॉन कारमधून विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वजाळे याला २ पिस्तुले, ४ जिवंत काडतुसे आणि कारसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही अग्निशस्त्रे राहुल सतीश माने याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पुढील तपासात अग्निशस्त्रांचा पुरवठा अनिल पंचलाल मेहता याच्याकडून होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

यानंतर अकलूज पोलिसांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कारवाई केली. तपासादरम्यान अनिल मेहता हा धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अग्निशस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक सोनगीरला रवाना झाले. तेथे कारवाई करत ४ अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच टेंभुर्णी परिसरातून राहुल माने यालाही ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात विविध ठिकाणी विक्री केलेल्या अग्निशस्त्रांचा शोध घेण्यात आला.

आरोपींकडून आणि त्यांच्या घरझडतीत पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल माने याने निवेदन पंचनाम्याद्वारे ६ पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे काढून दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ५, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची साखळी समोर आली असून, आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परीते, ता. माढा, जि. सोलापूर),  राहुल सतीश माने (वय ३४, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज, जि. सांगली), महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०, रा. कोरके वस्ती, करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव किरणगी (वय ३४, रा. शिवणूर, ता. आटणी, जि. बेळगाव, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (वय ३२, रा. रांजणगाव, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश), सुमित नाना लवटे (वय १९, रा. भुईटे वस्ती, सांगोला, जि. सोलापूर) या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलिस कर्मचारी श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजीत जगताप, तुकाराम माने, विजय तवटे, शरद कदम, सूरज हेंबाडे, अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड, प्रवीण मेटकरी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

[ays_poll cat_id=1]
error: Content is protected !!